५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. शिंदे – फडणवीस सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. मात्र अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. महागाई, पूरस्थिती, ओला दुष्काळ, ईडीच्या कारवाईविरोधात विरोधकांनी आज अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे – फडणवीस सरकारविरोधात आंदोलनास केले आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल होताच विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले’ अशा तुफान घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईडीच्या कारवाईविरोधातही विरोधकांनी ईडी सरकार हाय हाय…, शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो, धिक्कार असो, अशा घोषणाबाजी देखील केल्या.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रसेचे छगन भुजबळ, एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर, अंबादास दानवे सहभागी झाले आहेत.

यावेळी विरोधकांनी राज्यांत लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली. विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर एकजूट दाखवली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात दाखल होताच विरोधकांकडून ५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले अशा तुफान घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान शिंदे – फडणवीस सरकारमधील खातेवाटपाच्या धुसफुसीवरूनही विरोधकांनी टीकास्त्र डागले आहे. तसेच वंदे मातरम् सक्ती म्हणजे विकासावरून मुद्दा हिंदुत्वाकडे भरकटविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.