कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील ग्रुप नेहमीच सामजिक जाणीवेतून काम करत असून डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना वर्षभर मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याची घोषणा डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील होते.

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजने ३३ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनंतर 34 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त या निमित्त शुक्रवारी हॉटेल सयाजी येथे वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, सौ. शांतादेवी डी. पाटील, कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वास्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. अजय आवटे, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी डॉ. डी. वाय. पाटील व सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. मेडिकल कॉलेजचा ३३ वर्षांचा प्रवास व प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उतुंग भारारीवर तयार केलेल्या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले.
जनकल्याणाचे व्रत हातात घेवून दादासाहेबांनी उभ्या केलेल्या संस्था आपण व बंटी यांच्यासोबत ऋतुराज, पृथ्वीराज व तेजस ही तिसरी पिढी निश्चितपणे चांगल्या पध्दतीनं सभाळतील असा विश्वास ही कुलपती पाटील यांनी व्यक्त केला. दादासाहेबांनी विविध संस्था सुरु करताना सामाजिक जाणीवेतून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांचाच आदर्श घेऊन आमची वाटचाल सुरु आहे. म्हणूनच संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील व विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हॉस्पीटलाच्या माध्यमातून सुरु केलेली मोफत आरोग्य सेवा वर्षभर सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. या योजनेनुसार हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांना एस्क-रे, सिटी स्कॅन, एमआरआय आदी महागडया तपासण्या व उपचार पूर्णपणे मोफत केले जाणार आहेत. औषधाव्यतिरिक्त कोणताही खर्च रुग्णाला करावा लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
