गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास सादर : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील आरोग्य सेवेचे मुख्य केंद्र असलेल्या गारगोटी ग्रामीण रूग्णालयास राज्य सरकारने उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा दिला असून यासाठी १६ कोटी ३५ लाख रूपयाचा निधी मंजूर केला होता. सदर उपजिल्हा रुग्णालयाचे काम 80 टक्के पुर्ण झालेले असून सदर 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाकरीता आवश्यक अतिरिक्त पदे भरण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर केल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, गारगोटी हे तालुक्याचे मुख्य केंद्र असून या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात तालुक्यातील रुग्ण दाखल होतात. येथे उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा तसेच वेगवेगळ्या शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णांची गर्दी असते. तालुक्यात जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे असली तरी त्याठिकाणी मर्यादित सुविधा तसेच बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांअभावी सेवा मिळत नाहीत. यामुळे ग्रामीण रूग्णालयावर ताण पडतो.

त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रुपांतर करून नवीन इमारत बांधणे गरजेचे होते. याकरीता पाठपुरावा करून 16 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सद्यस्थितीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम 80 टक्के पुर्ण झाले असून या उपजिल्हा रुग्णालयाकरीता आवश्यक असणारी अतिरिक्त पदे भरणे गरजेचे आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टर, विविध शस्त्रक्रिया करण्याची सोय, विविध प्रकारच्या यंत्रसामुग्रीची सोय यासह विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारच्या व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचे सांगितले आहे.