कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामाबाबत राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला धनंजय महाडिक उपस्थित होते. नामदार गडकरी यांनी राज्यातील नव्या महामार्गांच्या बांधणीचा आढावा घेतला.

या बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांनी सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम रखडल्याबद्दल लक्ष वेधले. सर्वाधिक वर्दळ असलेल्या या महामार्गाचे सहापदरीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. त्यावर गडकरी यांनी खासदार महाडिक यांना सविस्तर माहिती दिली. सातारा ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, १२ कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुमारे साडेचार हजार कोटी रूपयांच्या कामाला दिवाळीच्या दरम्यान प्रत्यक्ष सुरवात होईल, असे नामदार गडकरी यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर होणारा बास्केट ब्रीज, याच सहापदरीकरणाच्या कामात समाविष्ट आहे. त्यामुळे बास्केट ब्रीजचे कामही लवकरच सुरू होणार आहे. हा बास्केट ब्रीज पूर्ण झाल्यावर महापुराच्या काळातही, महामार्गावरील वाहतुक सुरळीत राहील. तसेच शिरोली नाक्याकडून कोल्हापूरात प्रवेश करताना, प्रशस्त रस्ता तयार होईल. त्यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. नामदार गडकरी यांनी, सातारा ते कागल रस्त्याच्या सहापदरीकरणावर आपले पूर्ण लक्ष असल्याचे सांगितले. शिवाय खासदार महाडिक यांचाही पाठपुरावा असल्याने, हे काम वेळेत आणि वेगाने पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.