मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. येत्या ८ ऑगस्टपर्यंत त्यांना ईडी कोठडी देण्यात आली आहे.

पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने चार 31 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर कोर्टात हजर केले असता ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष इडी कोर्टात हजर केले.

संजय राऊत कोर्टात धनुष्य बाण चिन्ह असलेला भगवा मफलर घालून आले होते तो मफलर त्यांनी काढला जेव्हा त्यांना लक्षात आले की, ते कोर्टात आले. त्यानंतर सुनावणी सुरू झाली. तपासात नवीन आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आलीये तसंच काही व्यक्तींची आणि संजय राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. याकरता कोठडीत वाढ करुन देण्यात आली आहे. अलिबाग येथे जमिन घेतली तेव्हा जमिन मालकाला १.१७ कोटी रुपये रोख दिल्याचे ईडीने तपासात उघड झाल्याने सांगितले आहे.
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. ही रक्कम आणखीही असू शकते, असा दावा ईडीने कोर्टात केला आहे.
दोन नवीन आरोप करण्यात आले आहेत. अनोळखी व्यक्तीकडून राऊत यांना पैसे मिळाले तसेच अलिबाग येथील जमिनीच्या खरेदी प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात रोख रकमेचा वापर करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. मात्र, हे आरोप नवे नाहीत. याआधीही या आरोपांप्रकरणी चौकशी झालेली आहे. मात्र, ईडीकडून दबाव आणला जात आहे, धमकावले जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांच्या विकलांनी ईडीवर केला आहे.