पुणे : आमदार उदय सामंत यांच्यावर मंगळवारी रात्री पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली असून पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड केली आहे.

मंगळवारी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांची पुण्यात सभा होती. आदित्य ठाकरे यांची कात्रज चौकातील सभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांना त्या मार्गांवरून उदय सामंत यांची कार दिसली. या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या कारची मागची काच फोडली. यामुळे कारमधील एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी उदय सामंत यांनी तत्काळ पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही हल्लेखोरांचे फोटोही यावेळी दिले. दरम्यान, याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळे पोलिसांनीही आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि पाच जणांना अटक केली. यामध्ये शिवसंवाद सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार आणि पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे.

बबन थोरात यांनी १ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणामुळे शिवसैनिक चिथवले गेले असं म्हटलं जातंय. तुमच्या कार्यक्षेत्रात गद्दार आमदारांच्या गाड्या येतील. तेव्हा गद्दारांची गाडी जो शिवसैनिक पहिल्यांदा फोडेल त्याचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरव केला जाईल, असं बबन थोरात यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळेच कार्यकर्त्यांनी उदय सामंतांची गाडी फोडली असं म्हटलं जात आहे. त्यामुळे चौकशीसाठी त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये: डॉ.नीलम गोऱ्हे
पुण्यात शिवसेनेची कात्रजमध्ये सभा झाली. त्या सभेनंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे दिसून येत आहे. हल्ला करणारे नेमके कोण आहेत, हे जोपर्यंत स्पष्ट होत नही, तोपर्यंत ते शिवसैनिकच आहेत, असे गृहित धरणे चुकीचे असल्याचे शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
