मुंबई : पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यानंतर कोर्टाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

मुंबई सेशन कोर्टाच्या नंबर १६ मध्ये सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वकिलांनी युक्तिवाद करतांना सांगितले की, पत्राचाळचा सर्व व्यवहार संजय राऊतांच्या सांगण्यावरून प्रवीण राऊत करायचे. तसेच राऊतांना ३ वेळा समन्स देऊन ते एकदाच चौकशीसाठी उपस्थित होते. तर प्रवीण राऊतांनी एक कोटी रुपये संजय राऊतांच्या खात्यात टाकले, असा आरोप ईडीच्या वकिलांनी केला.
त्यानंतर राऊत यांचे वकिल अशोक मुदरंगी यांनी कोर्टात युक्तिवाद करतांना सांगितले की, राऊतांची अटक राजकीय हेतूने करण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांना अटक करून महिना झाला आहे. मग संजय राऊतांवर इतके दिवस कारवाई का झाली नाही असा सवालही राऊतांच्या वकिलांनी केला.
तसेच वर्षा राऊत यांनी कायदेशीररित्या थेट पैसे खात्यात घेतले असेही वकील म्हणाले. तर हे सर्व पैसे कायदेशीर मार्गाने कमावले होते असेही वकिलांनी सांगितले. तसेच राऊतांना ईडीची कोठडी झाल्यास त्यांना घरचे जेवण देण्यात यावी अशी मागणी वकिलांनी केली.
