मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्या घरावर आज सकाळी ईडीने धाड टाकली. ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सकाळी ७ वाजता दाखल झाले.
पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे. तब्बल ९. ३० तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील चौकशी सुरू आहे. दादरमध्ये जप्त केलेला फ्लॅट आणि अलिबागमधील जमीन या संदर्भात आता ईडी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे. जमीन आणि फ्लॅट हे वर्षा राऊत यांच्यावर नावावर असून, त्यापार्श्वभूमीवर त्यांची चौकशी सुरू आहे.
राऊतांना फोर्टमधील कार्यालयात नेण्यात येणार, अशी माहिती मिळत आहे. संजय राऊतांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सीआरपीएफ जवान देखील दाखल झाले आहेत.
शिवसेना सोडणार नाही
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान चार टविट केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असे टविट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.