कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज ट्विट करीत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, असे म्हटले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,
विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा.