मुंबई : राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले असताना शिंदे गटाने राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी सांगितले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपालांचं हे विधान राज्याचा अपमान करणार असून त्याबाबत केंद्र सरकारकडं आम्ही तक्रार करणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. केसरकर म्हणाले, राज्यपालांनी जे विधान केलं आहे ते राज्याचा अपमान करणारं विधान आहे. राज्यापाल हे संविधानिक पद असून त्यांच्यासंदर्भात केंद्र शासनाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळं राज्यपालांकडून पुन्हा अशी विधान येणार नाही, याबाबत केंद्र शासन त्यांना कळवू शकतं.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले की, मुंबईच्या उभारणीत सगळ्याच समाजाचा वाटा आहे. मात्र, त्यातही मोठा वाटा मराठी माणसांचा आहे. मुंबईतील औद्योगिक उभारणीत मुंबईच्या उभारणीत पारशी समुदायाचे मोठं योगदान आहे. पारसी सामाजानं देखील मुंबईच्या औद्योगिक वाढीत मोठं योगदान दिलं आहे. पण एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्या योगदानाबद्दल बोलायचं असतं पण त्यांनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही, असं म्हणणे म्हणजे मुंबईबद्दल अभ्यास केलेला नाही हे द्योतक आहे, असंही केसरकर यांनी म्हटलं आहे.