कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धनगर वाडी वस्तीवर कोणकोणत्या लाभाच्या योजना राबवता येतील याबाबत आज समाज कल्याण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठक दालनात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण होते.
बैठकीमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहू मिल येथे उभारण्यात आलेल्या समाज कल्याण विभागाच्या प्रचार प्रसिद्धी विभागात योजनांची माहिती देणाऱ्या बार्टी संस्थेच्या सहा तालुका समन्वयकांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी धनगर वाड्या व वस्तीवर कोण कोणता लाभ देता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये मेंढ्यांची लोकर काढणारे यंत्र, सर्पदंश झाल्यानंतर प्राथमिक सुरक्षा कीट म्हणून उपयोगात येणाऱ्या जनावर व माणवा करिता उपयोगी यंत्र, गम बूट, तसेच तांदूळ कांडप यंत्र या बाबत सविस्तर चर्चा झाली. याबाबत पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
त्याचबरोबर कमवा व शिका योजने अंतर्गत 1ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामावर हजर करून घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच तालुका पातळीवरील स्थानिक निधी लेखाबाबतचे परिच्छेद त्वरित पूर्तता न झाल्यास व याबाबत कामात चुकारपणा करणाऱ्या सदर कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. या बैठकीस समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.