जि. प. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी सचिन सांगावकर रुजू

कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे सचिन सांगावकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज शुक्रवारी कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारला.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील विजय कांडगावे यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. या पदाचा तात्पुरता कार्यभार हातकणंगले पंचायत समितीमधील उपअभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्याकडे होता.
सांगावकर हे २००० मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये उपअभियंता म्हणून रूजू झाले. २००५ ला रत्नागिरी येथे त्यांची बदली झाली. तेथून २००९ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे येथे काम पाहिल्यानंतर २०१२ ला कोल्हापुरात आले. गगनबावडा, राधानगरी येथे उपअभियंता म्हणून काम केले. २०१५ ला कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची पदोन्नती झाली.