कागलमध्ये मुश्रीफ गटास खिंडार; शेकडो तरुणांचा भाजपात प्रवेश

कागल (प्रतिनिधी) : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ गटाचे कट्टर समर्थक संदीप सोनुले यांच्यासह त्यांच्या शेकडो सहकारी कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रवेशाबद्दल त्यांचे स्वागत केले. त्यामुळे कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ गटास दुसऱ्यांदा खिंडार पडले आहे. अजूनही काही कार्यकर्ते मुश्रीफ गटातून राजे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते.

यावेळी घाटगे म्हणाले,” बेघर वसाहतीला पूर्वी शाहूनगर असे नाव होते. त्या शाहूनगर नगरचा लौकिक पुन्हा मिळवून देण्यासाठी या तरुणांनी केलेला प्रवेश आम्हाला हत्तीचे बळ देणार आहे. यावेळी उसना उमेदवार न आणता शाहूनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल. समाजकार्य करत असताना तुम्हाला लागेलं ते पाठबळ आमच्याकडून मिळेल. शासनाच्या विविध योजना कोणताही भेदभाव न करता राजकारण विरहित सर्वसामान्य मानसापर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिक पणे प्रयत्न करूया. कागलची “राजकीय विद्यापीठ “ही ओळख पुसून शाहूंचे कागल बनवण्यासाठी सर्वजण हातात हात घालून एकदिलाने काम करूया. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कागल नगरीच्या शाश्वत विकासासाठी एकसंध राहूया.

यावेळी स्वप्निल सणगर, रवींद्र गोंधळी, तुषार माने, वैभव सणगर,सुरेश शिंदे, प्रसाद सोनुले, विनायक म्हाळुंगकर, अजय गोंधळी, अमोल सोनुले, किरण भोई, विशाल पाटील, सुरेश मोहिते, नितिकेश वाडकर, प्रेम सोनार, अक्षय सोनुले, माणिक वायदंडे, प्रेम शिंदे, जुबेर माटे, आकाश पाटील, राहुल हेगडे, अक्षय साठे, मुकुंद गोंधळी, योगेश चौगुले,अनिकेत वडिनगेकर, अक्षय सोनुले,मयुर पाटणकर, राहुल मंगनाळे या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो तरुणांनी प्रवेश केला. यावेळी मागील आठवड्यात भाजपात प्रवेश केलेले नगरसेवक आनंदा पसारे उपस्थित होते.

पिक्चर अभी बाकी है…

विद्यमान नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे म्हणाले,” आम्ही प्रवेश करतेवेळी मुश्रीफ गटास आणखीन खिंडार पाडण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे आज आमचे मित्र संदिप सोनुले यांनी त्यांचे तरुण कार्यकर्त्यांनी समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला. राजेंना पाठिंबा देण्यास अनेक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे साथ देत आहेत हीच कागल मधील परिवर्तनाची नंदी आहे. भविष्यात मुश्रीफ गटास आणखीन खिंडार पडेल. ऐ तो झँकी है…. पिक्चर अभी बाकी है… असेही ते म्हणाले.