कागल (प्रतिनिधी): येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७४व्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता.२८) मोफत महाआरोग्य, कोव्हीड लस्सीकरण, व रक्तदान शिबीराचे कारखान्याचे “शिक्षण संकुल “कागल येथे आयोजन केले असून श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत या शिबिराचे आयोजन केले आहे. अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे, यावेळी रक्तदान शिबिरसह अठरा वर्षावरील नागरिकांना मोफत कोविड बूस्टर डोस लसीकरण ही करण्यात येणार आहे.
या शिबिरात हृदयविकार, मूत्रविकार, कॅन्सर, लहान मुलांची तपासणी व डोळे तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर एन्जोप्लास्टी, हार्ट अटॅक, बायपास सर्जरी, डायलिसिस, किडनी स्टोन व प्रोटेस्ट ग्रंथीच्या आजारांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून सिद्धिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर येथे मोफत उपचार केले जाणार आहेत.
या शिबिरात वैद्यकीय सल्ला, इसीजी, शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात येणार आहे . तसेच फक्त एक हजार रुपयांमध्ये अँजिओग्राफी तसेच टू डी इको व टीएमटी टेस्ट वर 50% ची सवलत, रक्त चाचणी, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन एमआरआय आदी तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.
या आरोग्य शिबिरात राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन संचलित सिद्धिविनायक नर्सिंग होमचे तज्ञ डॉक्टर्स तपासणी करणार आहेत .तपासणीसाठी येताना जुने रिपोर्ट घेऊन येणे आवश्यक आहे. श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर , (कारखाना शिक्षण संकुल) येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत हे मोफत महाआरोग्य शिबिर होईल.
या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ही पत्रकातून त्यांनी केले आहे.
तसेच स्व राजे जयंतीनिमित्त शाहू साखर कारखाना कार्यस्थळा ऐवजी सर्व कार्यक्रम कारखाना शिक्षण संकुल येथेच होणार आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी या ठिकाणीच उपस्थित राहावे .असे आवाहनही श्रीमती घाटगे यांनी केले आहे.
लहान मुलांची विशेष तपासणी
लहान मुलांच्या तपासणी विभागात हर्निया, हायड्रोसिल, सुंता करणे, अंडकोशाचे विकार, दुभंगलेले ओठ व टाळू इत्यादींची तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. तसेच गतिमंद, मतिमंद मुलांची तपासणी, वाचा व श्रवणदोष, अध्ययन व वाचन क्षमता, एकाग्रतेची समस्या यावर ही तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
