नवी दिल्ली – भारतातील दूध उत्पादन क्षेत्रातील सर्वच घटकांचे नेतृत्व करणाऱ्या डेअरी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असणाऱ्या इंडिअन डेयरी असोसिएशन नवी दिल्लीच्या संचालकपदी डॉ. चेतन अरुण नरके यांची संपूर्ण देशातील दूध उत्पादक गटातून बिनविरोध निवड करण्यात आली.

देशातील डेअरी उद्योगाला चालना मिळावी, डेअरी उद्योगातील विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वत्र पोहोचावे, या उद्योगातील प्रश्नांची सोडवणूक करून या क्षेत्राला योग्य दिशा देण्यासाठी ९ एप्रिल १९४८ साली बेंगलोर येथे इंडिअन डेअरी सायन्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यानंतर २३ सप्टेंबर १९७६ साली इंडिअन डेअरी असोसिएशन असे नामांतर झाले आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे हलवण्यात आले. देशात चार प्रमुख झोन सह विविध राज्यात आय डी ए चे कार्यालय आहे. महाराष्ट्रातून अरुण नरके हे गेली २९ वर्षे प्रतिनिधित्व करत होते, त्यांनी सुरवातीला वेस्ट झोन आणि नंतर नवी दिल्ली च्या प्रमुख संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे.
डॉ. चेतन नरके यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामाचा अनुभव आहे. आशियातील देशात एक अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. याचा फायदा दूध उत्पादक आणि डेअरी उद्योगाला नक्कीच होईल अशी अपेक्षा डेअरी उद्योग विश्वातून केली जात आहे.
माझ्या या पदाचा उपयोग सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हितासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करेनच पण याचसोबत ज्याप्रमाणे दूध उत्पादनात आपल्या देशाचा प्रथम क्रमांक आहे त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वाटा वाढवण्याचे उद्दिष्ट ठेऊन इथल्या घटकांना सर्व प्रकारचे सहाय्य कसे करता येईल यावर विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
