मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी केला आहे.
रामदास कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी आजन्म संघर्ष केला. हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास त्यांनी सोडली नाही. त्यांना आज संपूर्ण जग ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून ओळखते आणि त्यांच्याच मुलाने याच दोन पक्षांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद स्वीकारले. मी उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती केली होती की, या दोन्ही काँग्रेसबरोबर बसू नका. त्यांना ते नाही पटले. त्यावेळी त्यावेळी जो मातोश्रीची पायरी उतरलो, ते पावणेतीन वर्षे झाली आजपर्यंत पुन्हा ती पायरी चढलो नाही. हा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष नाही, असे सांगून रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे भोळे होते, असे उद्धव ठाकरे सांगतात. पण प्रत्यक्षात उद्धव ठाकरेच भोळे आहेत. त्यांना शरद पवार यांचा डाव समजला नाही. त्यांनी आज आमचा पक्ष फोडला. हीच आमच्या मनात भीती होती.
कोकणात कुणबी समाजाला बरोबर घेऊन, शासनाचे पाच-पाच कोटी रुपये देऊन शिवसेना कशी फोडता येईल, यासाठी शरद पवार प्रयत्न करत असल्याचा दावा मी यापूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता. त्यावेळी यासंबंधीची सर्व कागदपत्रे मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच मातोश्रीवर पाठवली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेतली असती तर, ना एकनाथ शिंदे यांच्यावर ही वेळ आली असती, ना त्यांच्याबरोबरच्या ५१ आमदारांवरही वेळ आली असती, असे ते म्हणाले.