नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली राष्ट्रपती पदाची निवडणूक आज (दि.18) होत आहे. भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी आपापले उमेदवार उभे केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू निवडणूक लढवत आहेत. विरोधी पक्षांकडून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना मुर्मू यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.

देशातील 4,800 खासदार आणि आमदार उद्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी मतदान करतील. संसद भवन आणि राज्य विधानसभांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानानंतर 21 जुलैस संसद भवनात मतमोजणी होईल. निकालानंतर 25 जुलैस भारताचे नवे राष्ट्रपती शपथ घेतील.
द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातील असल्याने देशाच्या सर्वोच्चपदी बसण्याचा मान आदिवासी समाजातील महिलेला त्यांच्या रुपाने प्रथमच मिळणार आहे. यशवंत सिन्हा विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत. सिन्हा पूर्वी भाजपत होते. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपची मते खेचून आणण्यात सिन्हा यांना यश येईल का? याची सर्वांना उत्सुकता आहे.
समाजवादी पक्षाने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. मात्र यूपीएत असूनही शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. सिन्हा यांचे नाव जाहीर होण्याआधी विरोधी पक्षांकडून महात्मा गांधी यांचे नातू आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार तसेच, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना निवडणूक लढवण्यासाठी संपर्क साधून आग्रह करण्यात आला होता. मात्र, त्यांनी नकार दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे तत्कालीन उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांना विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. एकूण 10,86,431 मतांपैकी विविध प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यानंतर एनडीएच्या उमेदवाराला 6.67 लाख मतांचे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने 60 टक्क्यांहून जास्त मते पडण्याची अपेक्षा आहे.
