शिंदे सरकारने पुन्हा केलं नामांतर; ‘हा’ शब्द वाढवला

मुंबई : औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण, आता शिंदे सरकारने त्यात ‘छत्रपती’ या शब्दाची भर घालत ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे. तसेच, उस्मानाबादचे नामांतरदेखील पुन्हा धाराशिव करण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी सवांद साधला.

ते म्हणाले, मावळत्या सरकारचे जबाबदारी ढकलणारे नाही तर उगवत्या सूर्याचे जबाबदारी स्वीकारणारे निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहेत.

औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर‘ असे नामकरण, उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ‘ आणि एमएमआरडीएला ₹60,000 कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

एमएमआरडीएच्या कर्जाला 12,000 कोटी रुपयांची शासकीय हमी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला.
थेट नगराध्यक्ष निवडीत पैशाची खेळी करता येत नाही, हे लक्षात आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तो निर्णय रद्द ठरविला होता.