गटर्स नसल्याने बहिरेश्वर- आमशी रस्त्यावर पावसाचे पाणी

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर ते आमशी रस्त्यावर साईड गटर्स अभावी पावसाचे पाणी साठुन राहत असल्याने रस्ता खराब होण्याच्या मार्गावर आहे. बांधकाम विभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

तब्बल 25 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मुख्यमंत्री सडक योजनेतून बहिरेश्वर कमान ते आमशी या मार्गावरील डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. सदर ठेकेदाराने जून 2022 पर्यंत हे काम पूर्ण केलेही पण तदनंतर जिओ आणि एअरटेल कंपनीने फायबर केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या साईड पट्टीवर चर खुदाई केली.जेसीबी च्या हायड्रोलिक स्टेमुळे काही ठिकाणी रस्ता उखडला आहे.
तसेच रस्ता झाल्यानंतर पाणी निर्गमन करण्यासाठी गटारीची आवश्यकता होती गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.
काही ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे रस्ता शेवाळू लागला आहे या सर्व बाबींमुळे गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे..