मुंबई : शिवसेनेचे धनुष्य बाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे मी ठामपणे सांगत आहे. आम्ही घटनातज्ज्ञ, कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून हे वक्तव्य करत आहोत. पक्षाचे निवडणूक चिन्ह हिरावून घेणे सोपे नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मातोश्रीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मात्र शिवसेनेपासून धणुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे मी माझ्या मनाचे सांगत नसून कायदेतज्ञ, घटनात्मक अभ्यासकांशी बोलून तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज आपणाला नाही. कारण शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करुन शकत नाही असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
शिवसेनेच्या भवितव्याला कोणताही धोका नाही. शिवसेनेने मोठी केलेली लोकं गेली, पण ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं होतं तो सामान्य मतदार शिवसेनेसोबतच आहे. शिवसेना ही काही वस्तू नव्हे, कोणी घेतला आणि पळत सुटला. रस्त्यावरील शिवसेना पक्ष हा अद्याप आपल्यासोबतच आहे. 50 किंवा 100 आमदार गेले तरी पक्ष संपू शकत नाही. पक्ष हा कायम राहतो. त्यामुळे सध्या या सगळ्यावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. विधिमंडळ आणि नोंदणीकृत पक्ष हे दोन्ही वेगवेगळे असतात, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत शिवसैनिकांमध्ये, सामान्य जनतेत संभ्रम तयार केला जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सुप्रीम कोर्टात 11 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत शिवसेनेच्या बाजूने निकाल येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एखाद दुसरा आमदार निघून गेल्यावर पक्ष संपत नसतो असेही त्यांनी म्हटले. गेले 8-15 दिवस अव्याहत रीघ लागली आहे, त्यांच्याशी बोलत आहे. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यांना मी मागे बोलले होतो, तुम्हाला काही वाटते की नाही, मला डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत. वाईट मलाही वाटले, भावना मलाही आहेत. मी माझ्या सैनिकांवर दडपण वाढेल, असे बोलत राहिलो तर योग्य नाही.