मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला आहे. शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. पदभार स्वीकारण्याआधी समर्थक आमदारांकडून पुष्पगुच्छ देऊन मंत्रालयात स्वागत करण्यात येत होते. पूजा केल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.

 मंत्रालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील दालनासमोर सुवासिनींनी मुख्यमंत्र्यांना औक्षण केलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला आहे. कार्यभार स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सचिवांशी चर्चा करून खऱ्या अर्थाने आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन गतिमान पद्धतीने कारभार करण्यावर भर द्यावयास सांगितले आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रबोधनकार केशव ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना यांनी वंदन केले. दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनास मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. यावेळी काही आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.