शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी; ‘हे’ नवे गटनेते

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची विधान भवनाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली असून एकनाथ शिंदेंच्याऐवजी आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या विधान भवनातील गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असे ट्विट केले आहे.

शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावर वर्णी लागली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांनी जर पक्ष सोडला तर त्यांच्यासोबत अनेक आमदार आणि नेते पक्ष सोडू शकतात. असा दावा अनेक राजकीय अभ्यासक करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या बैठकीला केवळ १८ आमदार उपस्थित असल्याने इतर आमदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षांसह ३५ आमदार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडाळी केल्याने उद्धव ठाकरे यांनी दुपारी वर्षा बंगल्यावर तातडीने बैठक बोलवली होती.

🤙 8080365706