मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. त्याचा केंद्रबिंदू गुजरातमधील सूरत असून त्याचे धक्के महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवेसेनेचे चार मंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेचे जवळपास २५ आमदार देखील असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने सावध हालचाली सुरू केल्या असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली आहे. शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचीही दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. त्यामुळे सरकारचे भवितव्य दुपारी १२ नंतर ठरणार आहे.

किमान पंचवीस आमदारांसह शिवसेनेचे नगर विकास मंत्री तसेच ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे थेट काल सायंकाळपासून नॉटरिचेबल असून ते थेट गुजरातमधील सुरत मधील हॉटेल मीडियन मध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कारभारावर गेले वर्षभर प्रचंड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आले आहे.
विधानपरिषदेच्या कालच्या निवडणुकीतही काँग्रेसबरोबरच शिवसेनेचीही मते फुटली आहेत ही फुटलेली सर्व मते एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची असण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळेच काल संध्याकाळी एकनाथ शिंदे विधानभवनातून मतमोजणीचा निकाल लागण्याआधीच बाहेर पडले. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचा शिक्का आहे अशा शिवसेना आमदारांचे मोबाईल फोन हे नॉटरिचेबल झाले आहेत. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरतमधील हॉटेलमध्ये असावेत असा सेना नेत्यांचा कयास आहे.
नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांना दिले असले तरीदेखील नगरविकास खात्याच्या कारभारावर युवासेना प्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल चालत होता. महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये देखील एकनाथ शिंदे यांना डावलत परस्पर नियुक्त्या केल्या जात होत्या. एकनाथ शिंदे यांनी याबाबत वारंवार त्यांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती मात्र तरीदेखील एकनाथ शिंदे यांच्या नाराज चित्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना शिंदे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या काही दिवसांमध्ये बळावली होती.
नोव्हेंबर २०१९ मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी चालून आली होती.
