मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत भाजपने चमत्कार घडवत महाविकास आघाडीचे पुन्हा एकदा पानिपत केले. भाजपने अचूक ‘नेम’ साधत महाविकास आघाडीचा गेम’ केला आहे. प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
या निवडणुकीत प्रविण दरेकर (भाजप), राम शिंदे (भाजप), श्रीकांत भारतीय (भाजप), उमा खापरे (भाजप), प्रसाद लाड (भाजप), सचिन अहिर (शिवसेना), आमशा पाडवी (शिवसेना), रामराजे नाईक- निंबाळकर (राष्ट्रवादी), एकनाथ खडसे (राष्ट्रवादी), भाई जगताप (काँग्रेस) हे विजयी झाले. महाविकास आघाडीची कागदावरील गोळाबेरीज ही प्रत्यक्षात वजाबाकी झाल्याने चंद्रकांत हंडोरे यांना दहाव्या जागेवर पराभवाला सामोरे जावे लागले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. दहा जागांसाठी अकरा उमेदवार मैदानात असल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली होती. भाजपकडून प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे व प्रसाद लाड मैदानात होते. तर शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर, राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक- निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे व भाई जगताप निवडणुकीच्या रिंगणात होते.
आज सकाळी नऊ वाजता प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ झाला. सायंकाळी चार वाजेपर्यंत २८५ आमदारांचे मतदान झाले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक व अनिल देशमुख यांनी मतदानासाठी परवानगी देण्याचा केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने महाविकास आघाडीचा पुन्हा भ्रमनिरास झाला.
मतदानानंतर काँग्रेसने भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप व पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या मतावर आक्षेप घेतल्याने मतमोजणीस विलंब झाला. काँग्रेसचे आक्षेप फेटाळल्यानंतर पाच वाजता सुरू होणारी मतमोजणी सातच्या सुमारास सुरू झाली.
१) प्रविण दरेकर (भाजप) २९ मते
२) राम शिंदे (भाजप) ३० मते
३) श्रीकांत भारतीय (भाजप) ३० मते
४) उमा खापरे (भाजप) २७ मते
५) प्रसाद लाड (भाजप) २८ मते
६) सचिन अहिर (शिवसेना) २६ मते
७) आमशा पाडवी (शिवसेना) २६ मते
८) रामराजे नाईक-निंबाळकर (राष्ट्रवादी) २८
९) एकनाथ खडसे (राष्ट्रवादी) २९ मते
१०) भाई जगताप (काँग्रेस) २६ मते