कोल्हापूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते, असा मूलमंत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

निमित्त होतं..’करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचं! कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील इयत्ता 10 वी 12 वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळे अंतर्गत पहिले सत्र संपन्न झाले, यावेळी जिल्हाधिकारी श्री रेखावार बोलत होते. यावेळी तज्ज्ञ व्याख्याते अहमदाबादच्या आय.आय.एम. संस्थेचे माजी विद्यार्थी तथा पुण्यातील ‘करिअर कॉर्नर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश हुंबे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनेत्रा महाराज- पाटील, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
ऋषिकेश हुंबे म्हणाले, करिअर सहजगत्या घडत नाही, प्रचंड मेहनतीनं ते घडवावं लागतं. जीवनात मोठं स्वप्न बघा. सकारात्मक विचार करा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी अंगभूत कौशल्य, क्षमता असते; ती ओळखून त्यानुसार करिअरची निवड करा, जेणेकरुन यश मिळवणं सोपं होईल, असे सांगून श्री हुंबे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात करिअर निर्माण करताना ‘हार्डवर्क’ला पर्याय नाही. चांगलं काम करून कामातून ओळख निर्माण करा.
निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी करिअर मार्गदर्शन शाळेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे सांगून आभार मानले.