कोल्हापूर : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गांधीनगरसह १३ गावांसाठीच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेच्या ३४४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे आता या गावांमधील प्रत्येक घरास नळ जोडणी करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन आदेश शुक्रवारी जारी करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

गांधीनगरसह १३ गावासाठीच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. याबाबत पालकमंत्र्यांसोबत आपण पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि या खात्याचे सचिव संजिव जयस्वाल यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरु ठेवला होता. या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या तांत्रिक छाननी समितीने, १९ मे २०२२ च्या बैठकीत मंजुरी दिली होती. त्यानंतर पुणे प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांची ३१ मे २०२२ रोजी तांत्रिक मान्यता मिळाली होती. त्यानंतर मौजे-सुधार गांधीनगरसह १३ गावे नळपाणी योजनेच्या ३४३ कोटी,६८ लाख, ६१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास जलजीवन मिशन कार्यक्रमातर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
सुरुवातीला २० गावांसाठी या पाणीयोजनेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही गावांनी या योजनेत सहभागी होण्यास नकार दिल्याने गांधीनगरसह १३ गावांसाठी ही सुधारित नळपाणी योजना कार्यान्वित केली जाणार आहे. या योजनेचा लाभ गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कणेरी, कळंबे तर्फ ठाणे, न्यू वाडदे, गोकुळ शिरगाव, कंदलगाव आदी गावांना होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. ही योजना पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या आत जि.प.कोल्हापूर ताब्यात घेईल. जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीकरिता योजनेच्या किमतीच्या १० टक्के रक्कम लोकवर्गणीच्या स्वरुपात ग्रामपंचायतीकडे ठेवणे आवश्यक आहे. योजना स्वयंनिर्भर बनवण्यासाठी पाणीपट्टी निश्चित करणे, त्यात वाढ करणे हे निर्णय ग्रामपंचायत घेईल, अशी माहिती त्यांनी दिली.