नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या ईडीकडून राजधानीतल्या मुख्यालयातचौकशी सुरू असून सुमारे डझनभर अधिकारी त्यांची चौकशी आणि तपास करत आहेत. यासाठी भलीमोठी प्रश्नावली राहुल गांधी यांना आधीच पाठवली असून त्याची उत्तरे राहुल गांधी त्यांच्या वकिलांच्या ताफ्यासह ईडीच्या कार्यालयात हजर राहून देत आहेत.
दरम्यान, त्याआधी काँग्रेसने आपला शक्तिप्रदर्शनाचा प्रयोग” नवी दिल्लीत करून घेतला. राहुल गांधी यांच्या समवेत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते राजस्थान आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे सगळे खासदार रूट मार्च करत ईडी कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, पोलिसांनी गाडीतून फक्त राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनाच ईडीच्या कार्यालयात जाऊ दिले. पोलिसांनी बॅरिकेट लावून काँग्रेस कार्यकर्त्यांना हटवल्यानंतर काही काळ काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या निमित्ताने काँग्रेस संघटनांनी एकवटून देशभरातल्या २५ राज्यांमधल्या राजधान्यांमधील ईडी कार्यालयांसमोर केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन केले आहे.