बंगळुरू : बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत ड्रग्ज घेतल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी त्याला बंगळुरूमधील उलासुरू पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे.

सिद्धांत कपूर एक स्टार किड आहे. तो शक्ती कपूरचा मुलगा आणि श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सिद्धांतने फिल्मी दुनियेतही हात आजमावला पण त्याला वडील आणि बहिणीप्रमाणे यश मिळालं नाही. सिद्धांतने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही केल्या आहेत. स्टार किड असूनही, सिद्धांत कपूरने डिस्क जॉकी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिद्धांतने ‘भूल भुल्लैया’, ‘भाग-भाग’, ‘चुप चुप के’, ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सिद्धांतने त्याची बहीण श्रद्धा कपूरसोबत स्क्रीनही शेअर केली आहे, दोन्ही भावंडं ‘हसीना पारकर’ चित्रपटात एकत्र दिसली होती, ज्यात श्रद्धाने दाऊदच्या बहिणीची भूमिका साकारली होती, तर सिद्धांतने या चित्रपटात दाऊदची भूमिका केली होती.