कसबा बावडा : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अत्याधुनिक रुग्णसेवा पोहचावी यासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटीबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून १५ ऑगस्टपर्यंत हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी व शस्त्रक्रियेसह उपचारही मोफत केले जातील, अशी घोषणा डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त हॉटेल सयाजी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते.

डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा वर्धापन दिन बुधवारी हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरिया सभागृहात उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं.
अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आईसाहेब सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्याहस्ते केक कापून सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. सी. डी. लोखंडे, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यानी बहारदार कलाविष्कार सादर करत रसिकांची मने जिंकली.
यावेळी बोलताना डॉ. संजय डी पाटील यांनी २० वर्षंच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे आरोग्य सेवेमध्ये मोठे योगदान असून यापुढेही राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. संस्थेचे उपाध्यक्ष सतेज डी पाटील व विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हॉस्पिटलमध्ये ५० दिवस मोफत तपासणी व उपचार शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हे मोफत उपचार शिबीर १५ ऑगस्टपर्यंत सुरु राहील अशी घोषणा डॉ. पाटील यांनी यावेळी केली. अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रास्ताविकमध्ये मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या प्रगतीचा आढावा घेतला. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड म्हणाल्या, कुलपती डॉ. संजय पाटील यांच्या भक्कम पाठबळामुळे २० वर्षांचा देदीप्यमान टप्पा हॉस्पिटलने पार केला आहे. आभार सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी मानले.
