गारगोटी : राधानगरी विधानसभा मतदार संघातील राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बांधणेसाठी प्रत्येक ५० लाख रुपये प्रमाणे १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे सांगितले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात. कुटूंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंन्त वेगवेगळया राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरुन केली जाते. याच धर्तीवर राधानगरी, भुदरगड व आजरा याठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बांधणेसाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये कोरोना काळामध्ये आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता नागरीकांची तपासणी करण्याकरीता अत्याधुनिक लॅबोरेटरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सदर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बांधणेसाठी निधी मंजूर करणेकामी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे प्रसिध्दीपत्रकात त्यांनी म्हटले आहे.
