मुंबई : राज्यसभा निवडणुकीमुळे अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वधारला असून अपक्ष आमदारांच्या मतांवरच सहाव्या जागेवरच्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. त्याबाबत विधान मंडळ कार्यालयाने निवडणूक आयोगाकडे माहिती मागवली होती, त्यावर अपक्ष आमदारांना त्यांचे मतदान कुणाला दाखवता येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

अपक्ष आमदार ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत, त्या पक्षाच्या प्रतिनिधींना त्यांनी केलेले मत दाखवणे आवश्यक आहे का?, अशी विचारणा विधान मंडळ कार्यालयाने केली होती, त्यावर निवडणूक आयोगानं त्याला उत्तर दिलं आहे. अपक्ष आमदार कोणालाही मत दाखवून मतदान करू शकत नाहीत, तसे केल्यास त्यांचे मत बाद ठरवले जाईल, असंही केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. दुसरीकडे पक्षांच्या आमदारांना त्यांच्या प्रतिनिधीलाच दाखवून मतदान करावे लागते आणि तसे न केल्यास पक्षाचा व्हिप झुगारून अन्य उमेदवाराला मत दिल्यास ते बाद ठरते, असा नियम असल्याचंही निवडणूक आयोगानं सांगितलं.