मुंबई : मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात किंवा भारतात नाही. त्यामुळे मंकीपॉक्सचे कुठलेही भय मनात ठेवायचे कारण नाही. खबरदारी म्हणून आपण विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मेडिकल स्क्रिनिंग करत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यामधील ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई आणि पुणे इथे कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. एकूण साडेतीन हजाराच्या आसपास सक्रिय रूग्ण सध्या राज्यामध्ये आहेत. त्यातील अडीच हजार रूग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आहेत. रूग्णालयात रूग्ण दाखल होण्याच्या संख्येमध्ये मात्र वाढ दिसत नाही. तसेच रूग्णालयांमध्ये रूग्णांची भर्ती मोठ्या प्रमाणात होत नसल्याने सध्यातरी जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नसल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.