एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी कामगिरीचा गौरव केला.

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात ते दूरदृष्य प्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाला परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी एम. के. भोसले, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना एसटीदेखील अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात त्यांना अपेक्षित ठिकाणी नेण्याचे कार्य एसटी गेली ७५ वर्ष करीत आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यातही एसटीचा वाटा आहे. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे आशिर्वाद घेताना संस्कृतीची जपणूकही एसटीच्या माध्यमातून होते आहे. सदस्याला आनंदात आणि समाधान ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. राज्याच्या प्रगतीचे एसटी कर्मचारी अविभाज्य घटक आहेत. आपण घेतलेले जनसेवेचे व्रत हातात हात घालून पुढे सुरू ठेऊया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

गतवैभव मिळवून देणारच- परिवहनमंत्री अनिल परब

एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून एसटीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. त्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही.  अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पण हा एसटीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. एसटीच्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. रस्त्यात अडचणी येतात, खड्डे असतात मात्र मार्ग काढत एसटीचा  प्रवास सुरू आहे. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. ही प्रत्येक गावातील माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

🤙 9921334545