सोनिया गांधी, राहुल गांधीना ईडीचे समन्स

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) आज, बुधवारी समन्स बजावले.

मनी लाँड्रिंग प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले आहे. हे प्रकरण २०१५  मध्ये बंद झालेल्या जुन्या खटल्याशी संबंधित आहे. आता त्या प्रकरणावर पुन्हा प्रकाश टाकण्यात आला असून ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे . ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सवर काँग्रेसने टीका केली आहे. भाजपकडून राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेस नेते आणि वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. नॅशनल हेराल्डचा स्वतःचा एक इतिहास आहे, जो स्वातंत्र्याच्या संघर्षकाळापासून सुरू झाला होता, असे ते म्हणाले. काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनीही भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. १९४२ मध्ये जेव्हा नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं, त्यावेळी इंग्रजांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. आज मोदी सरकारदेखील तेच करत आहे. त्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे.