सरुड : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) डॉ. आशितोष अरुण तराळ (वय ३८) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले.
सेवानिवृत्त होत असलेल्या ५८ वर्षीय तक्रारदार आरोग्य कर्मचाऱ्याकडे सेवानिवृत्ती पश्चातच्या लाभांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयातून मंजूर झाल्यानंतर पुरवणी बिलाच्या विनात्रुटी पूर्ततेसाठी विशेष सहकार्य करण्याच्या बदल्यात डॉ. तराळ याने तक्रारदाराकडे १२ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पैकी ठरलेला हप्ता म्हणून पाच हजार रुपये स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी डॉ. आशितोष तराळ हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही माहिती पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
संबधित तक्रारदाराने मलकापूर ग्रामीण रुग्णालयाकडे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. आशितोष तराळ यांनी केलेल्या लाचेच्या मागणी बाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाला दिल्यानंतर मंगळवारी मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात दाखल झालेल्या एसीबीच्या पथकाने या संपूर्ण प्रकरणाची गोपनीय पडताळणी केली. यामध्ये तथ्य आढळून आल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी मागणी केलेल्या लाच रक्कमेचा हप्ता म्हणून ५ हजार रुपये स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) डॉ. आशुतोष तराळ याला पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार व्यक्ती ही ३१ मे (मंगळवार) रोजी आरोग्य विभागातून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना मिळणाऱ्या सेवानिवृत्ती नंतरच्या शासकीय लाभांचा प्रस्ताव पुणे कार्यालयाकडून मंजूर होऊन आल्यानंतर स्थानिक कार्यालयाधीन पुढील कार्यवाही तसेच इतर प्रलंबित पुरवणी बिले विनात्रुटी पुढे पाठविण्यासाठी ५ हजार रुपये व वरिष्ठांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारोपा करीता ७ हजार रुपये, असे एकूण १२ हजार रुपये तक्रारदार यांचेकडे डॉ. तराळ याने लाचेची मागणी केली. मंगळवारी लोकसेवक डॉ. तराळ याने सेवानिवृत्तीच्या कामाचे ठरलेले ५ हजार रुपये तक्रारदार यांच्या कडून स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला.