कोल्हापूर : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील अर्जुनी येथील रहिवाशी नितीन आढाव यांच्याशी संवाद साधत त्यांची विचारपूस करताना, तुमचे शिक्षण किती झाले? तुम्ही काय करता? तुमची वडीलोपार्जित शेती आहे का? शेतीपुरक कोणता व्यवसाय करता? असे विचारल्यानंतर आढाव यांनी आपण दुग्धपालनचा (पशुपालन) व्यवसाय करत असल्याचे सांगितले. यावर पवारांनी समाधान व्यक्त करुन दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवावा, अशी सूचना केली. त्याचबरोबर करवीर तालुक्यातील हसुर दुमाला येथील श्रीमती जिजाबाई पाटील व सांगरुळ येथील श्रीमती लक्ष्मी साठे यांच्याशी देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी संवाद साधला.
यावेळी शासनाच्या घरकुल लाभाबरोबरच रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, शौचालय अनुदान, जलजीवन मिशनमधून नळ जोडणी, उज्वला योजनेतून गॅस, सौभाग्य योजनेतून वीज जोडणी व ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून बचत गटातून सहभाग तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याने आपल्या पक्के घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवि शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्रियदर्शनी मोरे यांच्यासह शासकीय विभागाचे अधिकारी आणि शासनाच्या विविध योजनाचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.