कोल्हापूर : कोल्हापुरात पूर कालावधीत राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळे पूर्ण शहराची वाहतूक ठप्प होते. यासंदर्भात नितीन गडकरी यांना उड्डाणपुलाची मागणी करणारे निवेदन अमल महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याला प्रतिसाद देत शहरात प्रवेश करताना ज्या ठिकाणी हायवेवर पुराचे पाणी येते त्या ठिकाणी उड्डाण पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त करून देणारे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमल महाडिकांना पाठवत सदर मागणीबाबत केंद्र सरकार सकारात्मक पावलं टाकत असल्याचे सांगितले.
या पत्रामध्ये म्हटलं आहे की, पुराच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणांवर उड्डाणपूल बांधण्यासाठी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये NH-48 वर कागल ते सातारा रस्ता सहापदरीकरणासह त्यामध्ये उड्डाणपूल, बॉक्स कलवर्ट, पाईप कलवर्ट इत्यादी गोष्टी नियोजित केलेल्या आहेत. तसेच पंचगंगा नदीवर 13 बॉक्स कलवर्ट नियोजित केलेले असून यासंदर्भात निविदासुद्धा मागवण्यात आल्याचा उल्लेख सदर पत्रामध्ये करण्यात आला आहे. कोल्हापूरकरांच्या महत्वपूर्ण अश्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कार्यवाही सुरू केल्याबद्दल अमल महाडिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे जाहीर आभार मानले.