निपाणी : मुलीच्या लग्नसमारंभासाठी चाललेल्या स्विफ्ट कारला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नवरीचा भाऊ, आजी, चुलता, चुलती असे एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाले.
निपाणीजवळील तंवदी घाटातील हॉटेल अमरजवळ हा भीषण अपघात झाला. महेश देवेगोडा पाटील (वय २३ ), छाया आदगोंडा पाटील (वय ५५), आदगोंडा बाबू पाटील (वय ५८), चंपाताई मगदूम (वय ८०) (सर्वजण राहणार बोरगाववाडी) हे चारजण जागीच ठार झाले असून कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान बेंगलोर वरून कोल्हापूरच्या दिशेने कंटेनर जात होता. तर स्विफ्ट कारमधून पाटील कुटुंबीय स्तवनिधी येथील मंगल कार्यालयाच्या दिशेने सेवा मार्गावरून जात होते. कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर सरळ पलीकडच्या सेवा रोडवर येऊन चारचाकीवर आदळला. या झालेल्या भीषण अपघातात मध्ये कंटेनरने स्विफ्ट या चारचाकीला धडक दिल्यामुळे तिचा चक्काचूर झालेला आहे. व हा अपघात इतका भीषण होता की गाडीतून मृतदेह काढण्यासाठी बाहेरून मशीन चा वापर करावा लागला. मृतदेह अर्धा तासाहून अधिक काळ अडकून पडले होते. या अपघातामध्ये नवरी मुलीचा भाऊ महेश याच्यासह, आजी, चुलता, चुलती जागीच ठार झाल्यामुळे पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे.