राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापूर शहरातील डायमंड हॉस्पीटल येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सातत्याने गेले तीन -चार दिवस होणाऱ्या बैठका, काल छत्रपती ताराराणी चौक येथील आंदोलन आणि सातत्याने नियोजन मंडळाच्या होणाऱ्या बैठका यामुळे झालेला कामाचा अतिरिक्त ताण क्षीरसागर यांना जाणवत होता. काल मध्यरात्री छातीत सौम्य कळ होऊ लागल्याने त्यांना तात्काळ डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची अँजिओग्राफी तपासणी करण्यात आली. यामध्ये एक शीर ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यामुळे तात्काळ क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. साईप्रसाद यांच्या देखरेखीखाली क्षीरसागर यांच्यावर उपचार सुरु असून, सद्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी स्वत: संपर्क साधून क्षीरसागर यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.