नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना आता मंकीपॉक्स व्हायरसची दहशत वाढू लागली आहे. रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असून आतापर्यंत १०० हून अधिक जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. युरोपीय देशांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स आणि इतर देशांत मंकीपॉक्स रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. मंकीपॉक्सच्या संदर्भात केंद्र सरकारने जे काही निर्देश दिले असतील. ते आम्ही तंतोतंत पाळू. लगेचच आरोग्य विभाग हाय अलर्ट लक्षात घेऊन आम्ही सर्व आरोग्य विभागाच्या शेवटच्या घटकापर्यंत या सर्व गोष्टी कळवू. तसेच ज्या सुचना दिल्या आहेत त्यांचं तंतोतंत पालन करू, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले