ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ‘ॲट्रॉसिटी’तंर्गत (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) केतकीला अटक झाली असून ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी रबाळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. केतकीविरोधात २०२० मध्ये ‘ॲट्रॉसिटी’तंर्गत तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी ॲड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.