पाटणा : सीबीआयने आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित दिल्ली आणि बिहारमधील १७ ठिकाणांवर छापे टाकले. माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटण्यातील शासकीय निवासस्थानावरही छापा टाकला आहे. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरतीत झालेल्या घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे.

रेल्वेत नोकरीच्या बदल्यात लोकांकडून जमिनी आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांच्यावर आहे. त्यांचा छोटा मुलगा तेजस्वी यादव पाटण्यात नसताना ही छापेमारी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तो लंडनला रवाना झाला होता. खुद्द लालू प्रसाद यादव सध्या त्यांची मोठी मुलगी आणि राज्यसभा सदस्य मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आहेत. पाटणा व्यतिरिक्त बिहारच्या गोपालगंज, दिल्ली आणि भोपाळमध्येही ही छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
राबडी देवी यांच्या पाटणा येथील 10, सर्कुलर रोड येथील निवासस्थानावर सीबीआयचे छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांनी राबडी देवी यांच्या निवासस्थानी प्रवेश करताच दरवाजे बंद केले. यानंतर आतून बाहेरून कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला. छापा सुरू झाल्यानंतर सुमारे एक तासाने सीबीआयचे अधिकारी राबडी देवी यांच्या घरी पोहोचले.