पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत, संभाजीराजेंनी डाव ओळखावा : निलेश राणे

मुंबई : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केली. त्यावर लगेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ असं सांगून राजेंना अडचणीत टाकलं आहे. उरलेली मतं राजघराण्याला? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत, असा टोला माजी खासदार व भाजपचे नेते निलेश राणे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले होते की, ‘छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. मीदेखील राज्यसभेत त्यांचा सहकारी आहे. ज्यावेळी महाराष्ट्राचे काही प्रश्न राज्यसभेत येतात तेव्हा महाराष्ट्रातील सदस्यांना बोलावून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येण्याची भूमिका आम्ही घेतो. अशा कामांमध्ये संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे. त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ. असं म्हणत पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावर ट्वीट करत निलेश राणे यांनी संभाजीराजे यांना सल्ला दिला आहे. राणे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली आणि लगेच पवार साहेबांनी आमची उरलेली मतं राजे ना देऊ सांगून राजेंना अडचणीत टाकलं. उरलेली मतं राजघराण्याला  राजे, पवार यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही.