राजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेणार असून 15 मे रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. विधी मंत्रालयाने याबद्दल अधिसूचना काढली आहे.

राजीव कुमार यांनी 2020 साली निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांची अशोक लवासा यांच्या जागी नियुक्ती झाली होती. ते झारखंड कॅडरचे 1984 बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते 2025 मध्ये सेवानिवृत्त होतील. 2024 च्या लोकसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वात होणार आहेत. राजीव कुमार यांनी 36 हून अधिक वर्षे शासकीय सेवेत घालवली आहेत. त्यांनी केंद्र आणि बिहार-झारखंड राज्य कॅडरमध्ये विविध मंत्रालयाचे कामकाज सांभाळले आहे.

बीएससी, एलएलबी, पीजीडीएम आणि एमए पब्लिक पॉलिसीचे शैक्षणिक पदवी असलेले राजीव कुमार यांना सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये कामाचा अनुभव आहे.