मटेरियल सायन्स संशोधनात डॉ. सी. डी. लोखंडे देशात तिसऱ्या स्थानी

कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे रिसर्च डिरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी मटेरियल सायन्स संशोधनामध्ये देशात तिसरे स्थान मिळविले आहे.

‘एल्सवेअर’ या जगप्रसिद्ध प्रकाशनगृहाने अलीकडेच या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संशोधकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत भारतरत्न प्रा. सी. एन. राव यांनी प्रथम स्थान मिळवले आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, जीवशास्त्र, धातुविज्ञान, खनिजशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयांचा एकत्रित अभ्यास मटेरियल सायन्समध्ये केला जातो. याचा वापर करून नवीन घन पदार्थांची निर्मिती, त्यांचा गुणअभ्यास व त्यांची उपयोगिता तपासणे तसेच वापरात असलेल्या पदार्थाचे गुणधर्म बदलून त्याचा विविध क्षेत्रात वापर करणे शक्य आहे. प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी अनेक नवनवीन पदार्थांची निर्मिती व त्यांचा वापर गॅस सेन्सार, सुपरकॅपॅसिटर, सौरघट इ. मध्ये केला आहे.
मटेरियल सायन्स संशोधनातील स्थान निश्चित करण्यासाठी जगभरातील एक लाख शास्त्रज्ञांचा डाटाबेस तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सायटेशन, एच इंडेक्स, प्रकाशित केलेल्या शोधनिबंधांचा दर्जा इ. निकषांचा वापर करण्यात आला आहे. त्यामधून पहिल्या दोन टक्के शास्त्रज्ञांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

डॉ. लोखंडे यांनी देशभरातील संशोधकांच्या यादीत प्रथम तीनमध्ये स्थान मिळवल्याबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, डी. वाय. पाटील एज्यूकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष गृहराज्य मंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्रकुलगुरू डॉ. शिंपा शर्मा व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अजितसिंह जाधव यांनी अभिनंदन केले.
🤙 9921334545