उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात 23 मेपर्यंत बंदी आदेश

कोल्हापूर : उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज सुरळीत व्हावे, उचंगी प्रकल्पाचे घळभरणी परिसरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रकल्पाचे घळभरणी ठिकाणापासून 2 कि.मी परिसरात दि. 9 ते 23 मे 2022 रोजी रात्री 12 या कालावधीत क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बंदी आदेश जारी केले आहेत.

   बंदी आदेश उचंगी प्रकल्पासाठी कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलीस, धरणाच्या कामासाठी उपयोगात येणारी वाहने, मशिनरी, संसाधने, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या वाहनांच्या संचारासाठी लागू राहणार नाहीत. या व्यतीरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती व वाहनांना परवानगी शिवाय या परिसरात बंदी आदेश कालावधीत संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

        कार्यकारी अभियंता, दूधगंगा कालवे विभाग क्र.1, कोल्हापूर यांनी उचंगी प्रकल्पाचे घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज बंद करुन येथील यंत्रसामुग्री नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने या ठिकाणी शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदी आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी म्हटले आहे.

        आदेशापुर्वी संबंधितांना नोटीस बजावणे शक्य नसल्याने, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आल्याचे आदेशात नमूद असून  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. सदरचा बंदी आदेश धरणाचे कामकाज करणारे अधिकारी,कर्मर्चारी, कंत्राटदार, पोलीस अधिकारी -कर्मचारी व शासकीय कर्मचारी यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे.