कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज गुरुवारी कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. कोल्हापूर पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेऊन मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमधून कोल्हापूरला पोहोचले आहे. न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सदावर्तेंनी केल्याची तक्रार दिलीप पाटील यांनी केली आहे. सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक काल मुंबईत दाखल झाले होते. मुंबई न्यायालयाने त्यांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचा आदेश दिल्यानंतर सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे दिला आहे. पोलिसांनी सदावर्ते यांचा बुधवारी सायंकाळी आर्थर रोड जेलमधून ताबा घेतला होता. काल मध्यरात्री हे पथक कोल्हापुरात दाखल झाले. अॅड. सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे.