सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक केली तरच पक्ष बळकट होईल : जयंत पाटील

जयसिंगपूर : राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा सामान्य माणसांच्यापर्यंत पोहचवून सामान्य माणसांच्या सामान्य प्रश्नांची सोडवणूक केली तरच पक्ष बळकट होईल, त्यासाठी बूथ कमिटी सदस्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची गरज आहे. तरच राष्ट्रवादी मोठया बळाने पुढे जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.


जयसिंगपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेदरम्यान मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. स्वागत शिरोळ तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील- टाकवडेकर यांनी तर प्रास्ताविक शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले, बुथ कमिटी सदस्यांनी रेशनकार्डपासून दाखले, उतारे मिळवण्यापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना मदत केली पाहिजे. तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट होईल. यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्याच्या विकासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.

हसन मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या हिताच्या योजना राबवल्या. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी केली. प्रामाणिक शेतकर्‍यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले तर कर्जमाफीत अपात्र झालेल्या शेतकर्‍यांना व्याजासहित रक्कम परत देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी अनुदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच त्यावर देखील निर्णय होईल.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, अनिल साळोखे, जिल्हा युवा अध्यक्ष रोहित पाटील, जिल्हा महिला अध्यक्ष शीतल फराकटे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश सचिव युवक अरुष असवे, प्रदेश युवती अध्यक्ष सक्षणा सलगर, बाबासाहेब देशमुख, यासीन मुजावर, पापा गाडवे, संतोष मेघाने, अमोल कुंभार, विजय पाटील, गजाधर मानधना यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545