मुंबई : महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबत आणखी पाच राज्यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्राने राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा नवे निर्बंध लागणार का? मास्कची पुन्हा एकदा सक्ती होणार का? असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोरोना रुग्णवाढीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाला आहे. महाराष्ट्रासह केंद्राने पाच राज्यांना पत्र पाठवले आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.
दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगडमध्ये पॉझिटिव्हिटी रेट ८ टक्क्यांवर गेल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे. सध्याच्या घडीला रुग्ण मोठ्या प्रमाणात जरी आढळून येत नसले, तरीही खबरदारी बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कोरोना वाढत असल्याने पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णवाढीचा वेग काळजी करायला लावणारा आहे. मंगळवारी २४ तासात ६३२ नवे कोरोना रुग्ण दिल्लीत आढळून आले, तर सोमवारी ५०१ नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे दिल्लीत २६ टक्क्यांनी रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद दिल्लीत मंगळवारी करण्यात आलेली नाही. तर ४१४ रुग्ण बरे झाल्याचेही मंगळवारी दिल्लीतील आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दिल्ली आणि आजूबाजूच्या सीमा भागातील नोएडा, एनसीआर, चंदीगड, इत्यादी भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे.
खरे तर रुग्णांचे प्रमाण जास्त नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळेच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून सतर्क राहण्याची सूचना केली आहे. गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटली होती. मात्र आता पुन्हा या संख्येने वेग पकडला आहे. दिवसाला हजार रुग्ण सापडू लागले आहेत.आठवड्यातील संक्रमण हे एक टक्क्यापेक्षा कमी आहे. यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, व्हॅक्सिनेशन आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजना या पंचसूत्रीचा पुन्हा अवलंब करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे गर्दी असताना मास्कचा वापर बंधनकारक करावा. कारण यामध्ये थोडी जरी कमतरता झाली तरी पुन्हा कोरोना उद्रेक होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.