कोल्हापूर : “माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाअंतर्गत सोमवारी शहरातील 73 व्याधीग्रस्त असलेल्या बालकांच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली. यामध्ये 3 पॉझिटिव्ह आढळले. महापालिकेच्यावतीने शहरातील व्याधीग्रस्त बालक असलेल्या कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येत आहे. व्याधीग्रस्त बालकाच्या कुटुंबातील व्यक्तींची 6 मिनिट वॉक टेस्ट घेऊन आलेल्या निष्कर्षानुसार कोविड टेस्ट, उपचार व संदर्भ सेवा देण्यात येत आहेत.
या अभियानाअंतर्गत 10 प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सोमवारी व्याधीग्रस्त बालकांच्या कुटुंबातील 411 नागरीकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 73 कुटुंबातील 286 जणांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये 105 नागरीकांची ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये 3 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर 108 जण निगेटिव्ह आले. तसेच 150 नागरीकांची आरटीपीसीआरची तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या 10 प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या भागामध्ये 28 वैद्यकिय पथकाद्वारे व्याधीग्रस्त बालकांच्या घरातील व्यक्तिंची तपासणी करण्यात आली.
शहरात 755 नागरीकांचे लसीकरण
शहरामध्ये सोमवारी 9 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पीटलमध्ये 60 वर्षावरील 588 नागरीकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस व 167 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला. शहरामध्ये पहिला व दुसरा डोस मिळून 755 नागरीकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे 101, फिरंगाई येथे 85, राजारामपूरी येथे 31, पंचगंगा येथे 68, कसबा बावडा येथे 72, महाडीक माळ येथे 10, फुलेवाडी येथे 66, सदरबाजार येथे 92, सिध्दार्थनगर येथे 72 व सीपीआर हॉस्पीटल येथे 158 इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आज अखेर 119564 इतक्या पात्र लाभार्थ्याना पहिल्या डोसचे तर 41490 इतक्या पात्र लाभार्थ्यांना दुस-या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. आज अखेर 45 वर्षावरील 51 टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.